अकोले तालुका
अहमदनगर जिल्हा

Tuesday, 26 June 2012

रामजी भांगरे

रामजी भांगरे

आदिवासी डोंगराळ भागात राहणा-या कोळी, भिल्ल, ठाकर या पराक्रमी वीरांनी इंग्रजांविरुद्ध कडवा संघर्ष करून त्यांना सळो कि पळो करून सोडले. १७९८ ते १८४८ या ५० वर्षांच्या काळात अकोल्याच्या कोळी बांधवांनी, रामजी भांगरे, राघोजी भांगरे, रामा किरवा, गोविंदराव खाडे इत्यादींनी इंग्रज सरकार विरोधात प्रखर लढा दिला.

रामजी भांगरे यांची इंग्रजांनी पोलीस जमादार म्हणून नेमणूक केली होती. तरीही त्यांनी इंग्रजांच्या अनेक जाचक अटीं विरोधात आवाज उठविला. कोळी बांधवाना एकत्र करून जुलमी सावकारांवर हल्ले केले. रामजीचे बंड मोडण्यासाठी कॅप्टन मॅकींतोष याने सर्व बाजूंनी नाकाबंदी करून त्याच्या काही साथीदारांना पकडले. रामजीचा कडवा साथीदार रामा किरवा त्यांच्या हातून निसटला. त्याने पुढे आपल्या चपळ हालचालीने इंग्रजांना बेजार केले. भिल्ल कोळी जमातीतील लोकांच्या मदतीने रामजीने अनेक जुलमी सावकारांवर दरोडे टाकले. कॅ.लेफ्टनंट फोर्बस् याने रामा किरवाला त्याच्या साथीदारांसह पकडले. राजद्रोहाच्या आरोपाखाली त्याला नगरच्या किल्ल्यात १८३० मध्ये सर्वांसमक्ष फाशी दिले. रामजीलाही काळ्या पाण्याची शिक्षा झाली. इंग्रजांच्या व सावकारशाहीच्या विरोधात लढून फाशी गेलेला रामा किरवा हा महाराष्ट्रातील पहिला हुतात्मा ठरला.

यामुळे इंग्रजांविरुद्धचे बंड शमले असे नाही. पुढे रामजीचा मुलगा राघोजी यानेही सावकारांवर छापे टाकून इंग्रजांविरुद्धचा असंतोष धगधगता ठेवला. तो आपली आई, पत्नी, भावजई यांच्यासह देवगावला राहत होता. राघोजी हा उमदा, चपळ, शूर व धाडसी वीर होता. राघोजीचा ठावठिकाणा शोधण्यासाठी इंग्रजांनी त्याच्या आईचा छळ सुरु केला. त्यामुळे तो आणखीनच संतापून इंग्रजांविरुद्ध पेटून उठला. त्यातच त्याला पकडण्यात इंग्रजांना यश आले. त्याला हातपाय बांधून राजुरच्या कोठडीत टाकले. परंतु त्याच्या आईच्या कल्पकतेने व पहा-यावरील जावजी बांबळेच्या सहका-याने तो सुटला. आणि परत देवगावात जाऊन देवजी महार, पाडोशीचा खंडू साबळे, चिचोंडीचा भाऊ धनगर यांच्या साथीने टोळी उभारून १८४४-४५ या काळात त्याने इंग्रजांना व सावकारांना त्रस्त करून सोडले.

पुढे फंदफितुरीने ही टोळी विस्कळीत झाली. त्यातच १८४५ च्या चकमकीत राघोजीचे अध्यात्मिक गुरु व मार्गदर्शक देवजी महार ठार झाल्याने तो आणखीनच खचला. राघोजी धार्मिक वृत्तीचा असल्याने आंबिवलीच्या पाटलाने त्याला दिंडी काढण्याचा आग्रह केला. वारकरी म्हणून तो त्यात सहभागी झाला. लेफ्टनंट गेलने २ जानेवारी १८४८ रोजी संन्याशाच्या वेशातील राघोजीला पंढरपूर येथील चंद्रभागेच्या वाळवंटात पकडले. त्याच्यावर राजद्रोहाचा खटला चालवून २ मे १८४८ रोजी ठाण्याच्या तुरुंगात त्याला फाशी दिले.

राघोजीने फाशीवर जाताना विनंती केली कि मी चोर नाही मला फासावर देऊ नका, माझे मुंडके तलवारीने उडवा. मला वीराचे मरण द्या. ठाण्याच्या तुरुंगात या आद्य क्रांतिकारकाचा पुतळा उभारला आहे. दरवर्षी २ मे रोजी त्याचे पुण्यस्मरण केले जाते.

0 comments:

Post a Comment

 

Sample text

Sample Text

Sample Text