बहिरवाडी
बहिरवाडी हे अमृतवाहिनी प्रवरा नदीच्या काठावर वसलेलं, सह्याद्री पर्वताच्या डोंगररांगांनी वेढलेले अकोले तालुकातील एक लहानसा आदिवासी खेडे आहे. अवघ्या हजारभर लोकवस्तीचे हे गाव. १९४८ साली प्राथमिक शाळेच्या रूपाने गावात शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली गेली. एक शिक्षकी शाळा सुरु झाली. ही शाळा गावातल्या देवळात भरायची. याच शाळेने इथल्या माणसांना अक्षरांची ओळख करून दिली.
पिढ्यान-पिढया काळ्या मातीत राबणाऱ्यांच्या पंखांना बळ दिलं. त्यातील अनेकांनी आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर भरारी घेतली. गावात सुधारणाचे वारे वाहू लागलं तसं गावकऱ्यांच्या सहभागातून शाळेचं रूप हळूहळू बदलत गेलं. १०० टक्के पटनोंदणी व उपस्थिती असलेल्या या शाळेनेआदिवासी मुला-मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात टिकवून ठेवलं आहे. काळ बदलला तसे शिक्षणाचे संदर्भही बदलले. शाळाही बदलते आहे.
शैक्षणिक उपक्रम
१. डिजिटल स्कूल: पद्मश्री डॉ.विजय भटकर यांच्या ETH या संस्थेच्या मदतीने शाळा आता. "डिजिटल स्कूल" झाली आहे. माहिती आणि संचार तंत्रज्ञानाच्या साह्याने अध्ययन, अध्यापन, व्यवस्थापन व समन्वयातून शिक्षणाचा दर्जा उंचावायचा प्रयत्न करीत आहोत. पाठ्यपुस्तकातील धडे व कवितांचा आशय समजून घेतल्यानंतर अनिमेशनच्या तंत्रामुळे विद्यार्थी दृकश्राव्य अनुभवही घेतात. अनिमेटेड फिल्म्स, मनोरंजक उपक्रम स्वाध्याय, चाचण्या, खेळ यांच्या मदतीने शिकताना विद्यार्थ्यांना निरनिराळ्या विषयांची गोडी लागली आहे.
२. इंटरनेटच्या मदतीने शिक्षण: शाळेतील विद्यार्थी विविध संकेत स्थळांना भेटी देऊन माहिती घेतात. टिपण काढतात त्यामुळे अध्ययन-अध्यापन प्रक्रिया प्रभावी होते. इंटरनेटच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे माहिती तंत्रज्ञानाने निर्माण केलेल्या माहितीच्या महाजालाशी नाते निर्माण झाले.
३. परिसर भेट: मुलांचे अनुभव विश्व व भाव विश्व समृद्ध करणार्या निरनिराळ्या ठिकाणांना विद्यार्थी भेटी देतात. माहिती घेतात त्यातून त्यांच्या ज्ञानाची कक्षा रुंदावते. उदा. न्यायालय, आठवडे बाजार, तुरुंग, पोलीस स्टेशन, वीट भट्ट्या, सुतारनेट, शेती, किरण, दुकान, पिठाची गिरणी, बँका, शेती सेवा केंद्र इत्यादी.
४. पर्यावरण संवर्धन: विद्यार्थ्यांनी बहिरोबा टेकडीच्या परिसरात १५०० वर झाडे लावली आहेत. त्याचे संगोपनही ते करीत आहेत. दरवर्षी रक्षाबंधनाच्या दिवशी मुले झाडांना राख्या बांधून त्यांचे एका अर्थाने पालकत्व स्वीकारत असतात.
५. हस्तलिखित: दरवर्षी "आमची बाराखडी" नावाचे हस्तलिखित शाळेच्या वतीने तयार केले जाते. या हस्तलिखिताचे वैशिष्ट्य म्हणजे विद्यार्थी स्वतःच्या भाषा प्रकारात लिहितात. ग्रामीण, आदिवासी विद्यार्थ्यांची भाषा ते प्रमाणभाषा तसेच कुटुंब ओ शाळा यांना जोडणारा सेतू म्हणून या उपक्रमाचे आगळे महत्त्व आहे. आदिवासी भागातील विद्यार्थी कमी बोलतात. लिहिताना कसेबसे लिहितात. लेखनाच्या माध्यमातून त्यांना त्यांच्या भाषेत व्यक्त होता यावे म्हणून प्रमाणभाषा तसेच व्याकरण याला फाटा देऊन विद्यार्थी मुक्तपणे लिहितात.
६. शेतीची अवजारे: पारंपरिक पद्धतीने शेतीची मशागत करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या अवजारांचा शाळेत संग्रह केलेला आहे. त्या अवजारांची नावे, त्यांचे उपयोग, हे अवजारे वापरल्याने होणारे फायदे विद्यार्थी सांगतात.
७. फिल्म डे: विविध भाषांतील वैशिष्ट्यपूर्ण चित्रपट शाळेत दाखवले जातात. त्यावर चर्चा केली जाते. विद्यार्थी आपली मते मांडतात. मनोरंजनातून शिक्षण हा यामागील उद्देश आहेच याशिवाय एखाद्या गोष्टीची चिकित्सा करण्याचा वस्तुपाठ म्हणजे हा उपक्रम होय.
८. स्वच्छता दिवस: दर मंगळवारी विद्यार्थ्याची वैयक्तिक स्वच्छता तपासली जाते. आदिवासी विद्यार्थी स्वच्छतेच्या सवयीच्या बाबतीत कधी-कधी दुर्लक्ष करीत. परंतु स्वच्छता दिवस या उपक्रमात विद्यार्थ्यांच्या स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यात आले. त्यामुळे स्वच्छतेच्या सवयी अंगिकारण्याने विद्यार्थी आजारी पडण्याचे प्रमाण कमी झाले आहे. दर मंगळवारी विद्यार्थ्यांकडून शाळेत कडूनिंबाच्या काडीने दात घासून घेतले जातात.
९. जंगलवाचन: विद्यार्थ्यांना परिसरातील जंगलाची सहल घडविताना प्रत्यक्ष अनुभूतीने शिक्षण दिले जाते. झाडे, वेळी, फुले, पशु-पक्षी, डोंगर- दऱ्या, या विषयाची माहिती स्थानिक माहितगार लोक विद्यार्थ्यांना सांगतात.
१०. वाचन संस्कार: विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी लावण्यासाठी विविध उपक्रम राबविले जातात. परिपाठात श्यामची आई, एक होता कार्व्हर यासारख्या पुस्तकांचे प्रकट वाचन घेतले जाते. वाचलेल्या पुस्तकावर विद्यार्थी गटागटाने बसून चर्चा करतात.
११. कात्रण संग्रह: विद्यार्थी वर्तमानपत्रे वाचतात. त्यातील विविध विषयांवरील बातम्या, छायाचित्रे, यांची कात्रणे काढतात. ती वहीत डकवतात. ऑलिंपिक, पंढरीची वारी, संगणक, जलोत्सव, बोधकथा, खेळ आदी विषयावर आधारित कात्रण संग्रह विद्यार्थ्यांनी केले आहेत.
१२. शब्दाची बाग : शाळेसमोरील पडक्या वाड्याच्या भिंतीवरील दगडांना निरनिराळे रंग देऊन त्यावर इंग्रजी, मराठी, हिंदी भाषांतील शब्द लिहिले आहेत. त्यात धरणांची, जिल्ह्यांची, किल्ल्यांची, संतांची, वर्तमानपात्रांची नावे, जोडाक्षरे लिहिली आहेत. त्यातून मुले भाषिक खेळ व प्रश्नमंजुषा खेळतात. वाचन तसेच सामान्य ज्ञान या बाबी सुधारण्यासाठी याचा उपयोग होतो.
१३. हस्ताक्षर सुधार प्रकल्प: विद्यार्थ्यांचे हस्ताक्षर सुधारण्यासाठी या प्रकल्पाचा फायदा होतो. देवनागरी लिपीतील मुळाक्षरे योग्य पद्धतीने लिहिण्यासाठी विशेष मार्गदर्शन केले जाते व सराव घेतला जातो.
१४. छंदवर्ग: नृत्य, गायन, वादन, वक्तृत्व, पाठांतर, रांगोळी, रंगभरण, वाचन, भटकंती, निरीक्षण आदि छंदांची जोपासना व्हावी यासाठी शाळेत छंद वर्गांचे आयोजन केले जाते. त्यातून विद्यार्थ्यांच्या निरनिराळ्या कलागुणांना खतपाणी घालताना व्यासपीठही उपलब्ध करून दिले जाते.
१५. विद्यार्थी वाढदिवस: दैनंदिन जीवन संघर्षात आणि रोजीरोटीच्या प्रश्नात ग्रस्त असणाऱ्या आदिवासी कुटुंबात मुलांचे कोडकौतुक करायला आई-वडिलांना वेळ नसतो त्यामुळे वाढदिवस ही कल्पनाच आदिवासी मुलांना माहित नव्हती. इतर मुलांचे वाढदिवस पाहताना ती मुले मनातल्या मनात कुढायाची. शाळेने प्रत्येक मुलाचा वाढदिवस करायला सुरुवात केली आणि आदिवासी मुलांच्या आयुष्यात वाढदिवस साजरे होऊ लागले. त्यांच्या कानावरही हॅप्पी बर्थ डे... चे सूर पडू लागले. वाढदिवसाच्या दिवशी मुले चॉकलेट, केक न आणता शालेय साहित्य आणतात. वाढदिवसाच्या निमित्ताने आपल्या गरीब सोबत्यांना भेट देतात.
१६. फटाकेमुक्त शाळा: पर्यावरण रक्षणासाठी शिक्षकांनी केलेल्या जाणीव-जागृतीला चांगली फळे येत आहेत. शिक्षकांच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत विद्यार्थ्यांनी फटाके मुक्त दिवाळी साजरी केली. फटाके न वाजविण्याची शपथच मुलांनी घेतली.
१७. क्रीडा: मुले विविध योगासने, सामुदायिक काव्यात करतात. खेळ खेळतात. झाडावर चढणे, डोंगर चढणे असे निरनिराळे खेळही खेळतात.
१८. विविध गुणदर्शन: दरवर्षी विविध गुणदर्शन कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. शाळेतील १०० टक्के विद्यार्थी यात सहभागी होतात. रंगमंचावर येऊन आपली कला सादर करतात. त्यातून त्यांना नवा आत्मविश्वास प्राप्त होतो.
0 comments:
Post a Comment