अकोले तालुका
अहमदनगर जिल्हा

Tuesday, 26 June 2012

वीर वामनराव जोशी

वीर वामनराव जोशी

वीर वामनराव जोशी – हे मूळचे समशेरपुरचे. शिक्षणाच्या निमित्ताने नाशिकला गेले असताना गुप्त क्रांतिकारकांशी त्यांचा परिचय झाला. ७ वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण झाले. परंतु देशप्रेम त्यांना स्वस्थ बसू देत नव्हते. गुप्त क्रांतिकारकांच्या मैत्रीतून आपणही देशासाठी काहीतरी करावे अशी तीव्र उर्मी त्यांना वाटत होती. शिक्षण अर्धवट सोडून त्यांनी स्वदेशी आणि बहिष्काराची शपथ घेतली. त्यातूनच बॉम्ब तयार करण्याचे प्रशिक्षण त्यांनी घेतले. अहमदनगर शहरातील गुजर गल्लीत बॉम्ब बनविण्याचे प्रशिक्षण देण्याचे कामही त्यांनी सुरु केले.

त्याचवेळी इंग्रजांनी लो.टिळकांना ६ वर्षाची काळ्या पाण्याची शिक्षा ठोठावली. अनंत कान्हेरे, वामनराव जोशी व त्यांच्या सहका-यांनी इंग्रज कलेक्टर जॅक्सनच्या खुनाची योजना आखली. २३ डिसेंबर १९०९ रोजी जॅक्सनवर गोळ्या झाडून त्याचा खून केला. या प्रकरणी इंग्रजांनी ७ आरोपींवर खटला चालविला. यात अकोल्याचे वीर वामनराव जोशी एक होते. त्यांना २५ वर्षाच्या जन्मठेपेची शिक्षा झाली. मे १९२२ मध्ये त्यांची सुटका झाली. परंतु स्वस्थ न बसता त्यांनी १९३० च्या "जंगल सत्याग्रहात" अग्रभागी राहिले. म.गांधींच्या चळवळीत ते सहभागी होते.





जुलमी मामलेदाराचा वध

इंग्रजांच्या काळात पिरजादे तथा काझी मामलेदार हा एक जुलमी व विलासी मामलेदार होता. त्याला मासे पकडण्याचा छंद होता. त्यामुळे त्याची कचेरीच नदीवर भरायची. खास यासाठी त्याने नदीवर घाट बांधून घेतला. तो जबरदस्तीने तरुणांना लष्कर भरतीसाठी पाठवित असे. म्हाळादेवी धरणाचे काम सुरु असताना त्याला होणारा विरोध मोडून काढण्यासाठी इंग्रजांनी या माम्लेदाराला विशेष अधिकार दिले होते. एकदा अगस्ति आश्रमातील काही तरुण संन्याशी नदी ओलांडून येत असताना या मामलेदाराने त्यांना पकडून बळजबरीने त्यांच्या तोंडात मासे कोंबले. आणि लष्करात भरती होण्याची बळजबरी केली. यामुळे तालुक्यातील जनता संतापाने पेटून उठली.

त्यावेळी अकोल्यात दर शनिवारी आठवडे बाजार भरत असे. पूर्व नियोजन करून परिसरातील हजारो शेतकरी, आदिवासी जनता कु-हाडी, काठ्या अशी मिळेल ती हत्यारे घेऊन बाजारच्या निमित्ताने अकोल्यात गोळा झाली. नियोजनानुसार या लोकांचे गट पाडले होते. काही गट संगमनेरहून येणा-या रस्त्यावर थांबले. त्यांनी रस्त्यावर मोठ्या झाडांच्या फांद्या पाडून रस्ता अडवून ठेवला. एक गट सरळ कचेरीकडे गेला व फाटकाला कुलूप लावून पोलिसांना धमकावून कोंडून ठेवले. तिसरा गट मामलेदाराला धडा शिकविण्यासाठी त्याच्या वाड्यावर गेला.

वेळ बघून मामलेदाराच्या बायकोने जमावापुढे पदर पसरून त्याच्या जीवाची भीक मागितली. जमावाच्या प्रक्षोभाने घाबरलेल्या मामलेदाराने जमावाच्या दिशेने गोळी झाडली. त्यात रावजी यादव हुतात्मा झाले. यामुळे जमाव आणखीनच भडकला. तेवढ्यात मामलेदाराने दुसरी गोळी झाडण्याचा प्रयत्न केला. परंतु गोळी सुटलीच नाही. संतापलेल्या जमावाने मामलेदाराच्या कुटुंबियांना सुरक्षितपणे वाड्याबाहेर काढले आणि मिरची पूड व रॉकेल टाकून वाडा पेटवून दिला. भयभीत झालेला मामलेदार जिवाच्या भयाने सैरावैरा पळू लागला. जमावातील काहींनी त्याला पकडून त्याच्यावर कु-हाडी चालविल्या. संतप्त जमावाने खांडोळी केलेला मामलेदाराचा देह त्याच्याच घोडा गाडीत टाकून पेटलेल्या वाड्याच्या आगीत लोटून दिला.

इंग्रज सरकारच्या या जुलमी मामलेदाराचा वध ही अकोल्यातील जनतेसाठी अभिमानाची घटना बनून राहिली आहे.

1 comment:

  1. खूप सुंदर आणि अद्ययावत माहिती आहे...

    ReplyDelete

 

Sample text

Sample Text

Sample Text