अकोले तालुका
अहमदनगर जिल्हा

Tuesday, 26 June 2012

अगस्ती आश्रम

अगस्ती आश्रम

अगस्ती आश्रम म्हणजे असामान्य तीर्थ क्षेत्र सर्व अनुकूल व प्रतिकूल बाबींचा विचार केल्यास श्री क्षेत्र अगस्ती ऋषी आश्रम हा जिल्ह्यात नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र दक्षिण भारतात एक आराध्य असे दैवत आहे.

पूर्वाश्रमीच्या दंडकारण्य व आजच्या आदिवासी तालुक्याच्या ठिकाणी प्रवरा उर्फ अमृतवाहिनीच्या तीरावर अतिशय निसर्ग रम्य परिसरावर अगस्ती ऋषींनी आपला आश्रम उभारला आहे. ही दक्षिणेतील पहिली मानवी वसाहत होय. भेटी अंती आज ही त्या पवित्र परिसरात दाखल होताच दंडकारण्याची आठवण झाल्याशिवाय रहात नाही.
अगस्ती आश्रम

लाखो भाविकांचे श्रध्दा स्थान असल्याने येथे शेकडो भाविक येत असतात. चारीधाम पूर्ण केले तरी अगस्ती दर्शनाविना ती यात्रा पूर्ण होत नाही. म्हणून यात्रा कंपनी येथे खास येऊन दर्शन घडवितात.शेजारील जिल्ह्यातून शैक्षणिक सहली आवर्जून येतात. भरपूर पाणी, सहा एकर असा परिसर चोहोबाजूस हिरवीगार वनश्री स्वच्छ व आरोग्य दायी हवा, दळणवळणाची उत्तम सोय अकोले शहरापासून अवघ्या दीड किलो मीटरवर आश्रम. बहुतांश भाविक दर्शनास पायी जातात. दूरध्वनी केंद्र, भ्रमणध्वनी केंद्र, बॅंका, पतसंस्था, मुख्य टपाल कचेरी, तहसिलदार ऑफिस, पंचायत समिती, पोलिस हेडकॉर्टर, ग्रामीण रूग्णालय, प्राथमिक पासून उच्च शिक्षणापर्यंत सोय. अगस्ती परिसर हा ध्वनी प्रदूषण, जल प्रदूषणापासून मुक्त आहे. ही इतर तीर्थ क्षेत्रा पेक्षा विशेष बाब आहे.

जिल्ह्यातील इतर तीर्थ स्थळे ही एक हजार वर्षाच्या आत उदयाला आलेली आहेत. पण अगस्ती आश्रम हा चार युगे झाली तरी भाविकांचे श्रध्दा स्थान म्हणून प्रसिध्द आहे. आज ही भाविक तितक्याच भावनेने आश्रम परिसरात येऊन धन्य होतात.

अगस्ती आश्रमाचे पौराणिक महत्व

अगस्ती ऋषी हे सर्व विश्वाला परिचित असे ऋषी असुन त्यांचा जन्म कुंभात झाला. अग्नि व वायु याचे ते अवतार. मित्रा-वरूणी त्यांचे वडील होत. जन्मतःच ते तप करण्यासाठी वनात निघून गेले. कठोर तपश्चर्या करून तपश्चर्येचा मुकूटमणी म्हणून ते प्रसिध्द झाले.

ऋषी म्हणजे जप, तप, ध्यान हेच त्यांचे कार्य पण अगस्ती ने लोकहिताची अनेक कार्ये करून हक्क मिळवुन देण्यात ते अग्रेसर राहिले. समुद्र प्राशन, नहुषपतन व विंध्य विजय याबरोबरच त्यांनी वातापी नावाच्या दैत्यास आपल्या जठराग्नीत पचविले. व त्याचा भाऊ इलवल यास हुंकाराने भस्म केले. व त्याच्या मुलास राज्याभिषेक करून राज्य प्रदान केले.

कावेरी व सुवर्णमुखरी ( प्रवरा ) या नद्या अगस्तीमुळेच भुमिवर अवतरल्या. अगस्तीने सर्वात मोठे कार्य केले ते म्हणजे शुक्रचार्यांनी दंड राजाला त्याची राज्य सीमा भस्मसात केली होती. ती भुमी शापमुक्त करून त्या भूमीवर सृष्टी निर्माण केली. व त्याचे रूपांतर दंडकारण्यात झाले. दंडकारण्याच्या मध्यावर आपला आश्रम उभारून पहिली मानवी वसाहत निर्माण केली. तोच आश्रम म्हणजे अकोले शहराजवळ प्रवरा तीरी असणारी पहिली वसाहत.

अगस्ती आश्रमाला महान परंपरा असून येथे सर्व प्राणी, पशु, पक्षी सर्वच वैरभाव विसरून एकत्र रहात होते. वनवासाचे काळी प्रभु राम अगस्ती आश्रमात प्रथम आले. तेव्हा ते लक्ष्मणाला म्हणाले “लक्ष्मणा, परत हे दृश्य आर्यवर्तात (भारतात) कधीही दिसणे शक्य नाही.” त्यावेळी अगस्तीने आपणाजवळ असणारे ब्रम्हास्त्र (बाण) श्री रामास याच आश्रमात भेट दिला. नंतर दोन वेळा येथे पुष्पक विमान उतरविले, श्रीरामाने अगस्तीचे दर्शन घेतले. भगवान शंकर पार्वती यांनी या आश्रमात तीन दिवस वास्तव्य केले होते. अशी या आश्रमाची ख्याती युगेयुगे चालली असून आजही ती प्रथा चालू आहे.

यात्रेकरूंच्या भेटी

अगस्ती ऋषी हे महान तपस्वी असल्याने त्यांच्या दर्शनाला येणा-या व्यक्तीस कधीही बंधन नाही. तसेच हा आश्रम सत्य युगापासुन अस्तित्वात आहे. इतक्या नोंदी ठेवणे शक्य नव्हते.

१) त्रेता युगात अगस्ती आश्रमात भेट देणारे पहिले महापुरूष प्रभुरामचंद्र लक्ष्मण व सीतावनवासात असत्यावेळी अगस्ती आश्रमात येऊन त्यांचे आशिर्वाद घेतले. त्यावेळी शस्त्रे, अस्त्रे व रावणाचा अंत करणारा बाण अगस्तीने श्रीरामास भेटी अंती दिला.

२) वैशाख शुध्द चतुर्थीस रामरावण युध्द पश्चात अयोध्येस परत जाते वेळी हनुमान वगळून सर्वजन पुष्पक विमान आश्रमात उतरून सर्वांनी अगस्तीचे दर्शन घेतले.

३) रामाचा अभिषेक झाल्यावर त्यांच्या राज्यात एका बालकाचा मृत्यु झाला. त्यावेळी श्रीराम पुष्पक विमानाने सह्याद्री पर्वतावर आले. व त्यांनी”शंबूक” केला. तेव्हा अगस्ती ऋषींनी त्यांचे आश्रमाजवळ बारा वर्षाचे जलशय्या व्रत केले होते. त्या समाप्तीस प्रभु उपस्थित राहिले. त्या रात्री त्याने ह्या आश्रमात निवास केला. व सकाळी अयोध्येस गमन केले.

४) सीतेचे अपहरण झाले तेव्हा भगवान शंकर न पार्वती तीन दिवस ह्या आश्रमात वास्तव्य केले होते. परतीच्या वेळी पार्वतीने सीतेचे रूप धारण करून श्रीरामांची परिक्षा केली होती.

५) रामायणपश्चात अगस्ती ऋषी अन्यत्र तीर्थयात्रेस गेले. तसेच हा दंडकारण्याचा मध्य असलेने हा भाग प्रसिध्दी पासून वंचित राहिला इ.स. १८०० पर्यंत ह्या भागाकडे दुर्लक्ष झाले. इंग्रजांच्या राज्याच्यावेळी ह्या भागात थोडाफार विकास झाला. आज ही हा तालुका आदिवासी म्हणूनच ओळखला जातो. इ.स. १९८५ पर्यंत ह्या आश्रमात जाण्यासाठी मोटारीचा मार्ग नव्हता. १९८७ला मोटार मार्ग तयार केला. त्यापासुन पुढे व्यवस्थित होत आहे. इ.स. १९५९ च्यावेळी अगस्ती ऋषींची नवीन मुर्ती ह.भ.प. सोनोपंत दांडेकर मामा व धुंडा महाराज देगलोरकर यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा झाली. भारत देश स्वतंत्र झाल्यापासून व राज्य घटना अस्तित्वात आल्यापासून खासदार व आमदार जे निवडणुकीत उतरतात. ते सर्व आपला प्रचार अगस्ती आश्रमापासुनच करतात.

0 comments:

Post a Comment

 

Sample text

Sample Text

Sample Text