अकोले तालुका
अहमदनगर जिल्हा

Tuesday, 26 June 2012

अकोले

अहमदनगर जिल्ह्यातील अकोले हे तालुक्याक्याचे ठिकाण आहे .

चोहीबाजुने हे शहर डोंगरांनी वेढलेले आहे. सभोवताली सातारा, गर्दनी, ढग्या असे डोंगर आहेत. शहराच्या एकाबाजुला साखर कारखाना आहे. शहराच्या शेजारीनवलेवाडी, धुमाळवाडी, माळीझाप, शेकइवाडी हे गावे आहेत. अकोले शहराचा इतिहास स्वातंत्रपुर्व काळात एक छळ करणारा मामलेदार जिवंत जाळल्याची घटना सांगतात.



रतनगड, मदनगड ,कुलंग ,आजोबागड, बितनगड, पाबरगड यासारखे किल्ले, व हरिश्चंद्रगड या तालुक्यात आहे. वैशिष्ट्यपूर्ण भौगोलिक रचना असणारे फोफसंडी हे ठिकाण याच तालुक्यात आहे. महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कळसूबाई अकोले तालुक्यात आहे.


अकोले शहराजवळ अगस्ती आश्रम नावाचे स्थळ आहे. या स्थळी रामाची अगस्तीशी भेट झाली, असे मानले जाते. या तालुक्यातल्या रतनवाडी गावातअमृतेश्वर मंदिर नावाने ओळखले जाणारे हेमाडपंती स्थापत्यशैलीचे मंदिर आहे.

वीर वामनराव जोशी

वीर वामनराव जोशी

वीर वामनराव जोशी – हे मूळचे समशेरपुरचे. शिक्षणाच्या निमित्ताने नाशिकला गेले असताना गुप्त क्रांतिकारकांशी त्यांचा परिचय झाला. ७ वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण झाले. परंतु देशप्रेम त्यांना स्वस्थ बसू देत नव्हते. गुप्त क्रांतिकारकांच्या मैत्रीतून आपणही देशासाठी काहीतरी करावे अशी तीव्र उर्मी त्यांना वाटत होती. शिक्षण अर्धवट सोडून त्यांनी स्वदेशी आणि बहिष्काराची शपथ घेतली. त्यातूनच बॉम्ब तयार करण्याचे प्रशिक्षण त्यांनी घेतले. अहमदनगर शहरातील गुजर गल्लीत बॉम्ब बनविण्याचे प्रशिक्षण देण्याचे कामही त्यांनी सुरु केले.

त्याचवेळी इंग्रजांनी लो.टिळकांना ६ वर्षाची काळ्या पाण्याची शिक्षा ठोठावली. अनंत कान्हेरे, वामनराव जोशी व त्यांच्या सहका-यांनी इंग्रज कलेक्टर जॅक्सनच्या खुनाची योजना आखली. २३ डिसेंबर १९०९ रोजी जॅक्सनवर गोळ्या झाडून त्याचा खून केला. या प्रकरणी इंग्रजांनी ७ आरोपींवर खटला चालविला. यात अकोल्याचे वीर वामनराव जोशी एक होते. त्यांना २५ वर्षाच्या जन्मठेपेची शिक्षा झाली. मे १९२२ मध्ये त्यांची सुटका झाली. परंतु स्वस्थ न बसता त्यांनी १९३० च्या "जंगल सत्याग्रहात" अग्रभागी राहिले. म.गांधींच्या चळवळीत ते सहभागी होते.





जुलमी मामलेदाराचा वध

इंग्रजांच्या काळात पिरजादे तथा काझी मामलेदार हा एक जुलमी व विलासी मामलेदार होता. त्याला मासे पकडण्याचा छंद होता. त्यामुळे त्याची कचेरीच नदीवर भरायची. खास यासाठी त्याने नदीवर घाट बांधून घेतला. तो जबरदस्तीने तरुणांना लष्कर भरतीसाठी पाठवित असे. म्हाळादेवी धरणाचे काम सुरु असताना त्याला होणारा विरोध मोडून काढण्यासाठी इंग्रजांनी या माम्लेदाराला विशेष अधिकार दिले होते. एकदा अगस्ति आश्रमातील काही तरुण संन्याशी नदी ओलांडून येत असताना या मामलेदाराने त्यांना पकडून बळजबरीने त्यांच्या तोंडात मासे कोंबले. आणि लष्करात भरती होण्याची बळजबरी केली. यामुळे तालुक्यातील जनता संतापाने पेटून उठली.

त्यावेळी अकोल्यात दर शनिवारी आठवडे बाजार भरत असे. पूर्व नियोजन करून परिसरातील हजारो शेतकरी, आदिवासी जनता कु-हाडी, काठ्या अशी मिळेल ती हत्यारे घेऊन बाजारच्या निमित्ताने अकोल्यात गोळा झाली. नियोजनानुसार या लोकांचे गट पाडले होते. काही गट संगमनेरहून येणा-या रस्त्यावर थांबले. त्यांनी रस्त्यावर मोठ्या झाडांच्या फांद्या पाडून रस्ता अडवून ठेवला. एक गट सरळ कचेरीकडे गेला व फाटकाला कुलूप लावून पोलिसांना धमकावून कोंडून ठेवले. तिसरा गट मामलेदाराला धडा शिकविण्यासाठी त्याच्या वाड्यावर गेला.

वेळ बघून मामलेदाराच्या बायकोने जमावापुढे पदर पसरून त्याच्या जीवाची भीक मागितली. जमावाच्या प्रक्षोभाने घाबरलेल्या मामलेदाराने जमावाच्या दिशेने गोळी झाडली. त्यात रावजी यादव हुतात्मा झाले. यामुळे जमाव आणखीनच भडकला. तेवढ्यात मामलेदाराने दुसरी गोळी झाडण्याचा प्रयत्न केला. परंतु गोळी सुटलीच नाही. संतापलेल्या जमावाने मामलेदाराच्या कुटुंबियांना सुरक्षितपणे वाड्याबाहेर काढले आणि मिरची पूड व रॉकेल टाकून वाडा पेटवून दिला. भयभीत झालेला मामलेदार जिवाच्या भयाने सैरावैरा पळू लागला. जमावातील काहींनी त्याला पकडून त्याच्यावर कु-हाडी चालविल्या. संतप्त जमावाने खांडोळी केलेला मामलेदाराचा देह त्याच्याच घोडा गाडीत टाकून पेटलेल्या वाड्याच्या आगीत लोटून दिला.

इंग्रज सरकारच्या या जुलमी मामलेदाराचा वध ही अकोल्यातील जनतेसाठी अभिमानाची घटना बनून राहिली आहे.

रामजी भांगरे

रामजी भांगरे

आदिवासी डोंगराळ भागात राहणा-या कोळी, भिल्ल, ठाकर या पराक्रमी वीरांनी इंग्रजांविरुद्ध कडवा संघर्ष करून त्यांना सळो कि पळो करून सोडले. १७९८ ते १८४८ या ५० वर्षांच्या काळात अकोल्याच्या कोळी बांधवांनी, रामजी भांगरे, राघोजी भांगरे, रामा किरवा, गोविंदराव खाडे इत्यादींनी इंग्रज सरकार विरोधात प्रखर लढा दिला.

रामजी भांगरे यांची इंग्रजांनी पोलीस जमादार म्हणून नेमणूक केली होती. तरीही त्यांनी इंग्रजांच्या अनेक जाचक अटीं विरोधात आवाज उठविला. कोळी बांधवाना एकत्र करून जुलमी सावकारांवर हल्ले केले. रामजीचे बंड मोडण्यासाठी कॅप्टन मॅकींतोष याने सर्व बाजूंनी नाकाबंदी करून त्याच्या काही साथीदारांना पकडले. रामजीचा कडवा साथीदार रामा किरवा त्यांच्या हातून निसटला. त्याने पुढे आपल्या चपळ हालचालीने इंग्रजांना बेजार केले. भिल्ल कोळी जमातीतील लोकांच्या मदतीने रामजीने अनेक जुलमी सावकारांवर दरोडे टाकले. कॅ.लेफ्टनंट फोर्बस् याने रामा किरवाला त्याच्या साथीदारांसह पकडले. राजद्रोहाच्या आरोपाखाली त्याला नगरच्या किल्ल्यात १८३० मध्ये सर्वांसमक्ष फाशी दिले. रामजीलाही काळ्या पाण्याची शिक्षा झाली. इंग्रजांच्या व सावकारशाहीच्या विरोधात लढून फाशी गेलेला रामा किरवा हा महाराष्ट्रातील पहिला हुतात्मा ठरला.

यामुळे इंग्रजांविरुद्धचे बंड शमले असे नाही. पुढे रामजीचा मुलगा राघोजी यानेही सावकारांवर छापे टाकून इंग्रजांविरुद्धचा असंतोष धगधगता ठेवला. तो आपली आई, पत्नी, भावजई यांच्यासह देवगावला राहत होता. राघोजी हा उमदा, चपळ, शूर व धाडसी वीर होता. राघोजीचा ठावठिकाणा शोधण्यासाठी इंग्रजांनी त्याच्या आईचा छळ सुरु केला. त्यामुळे तो आणखीनच संतापून इंग्रजांविरुद्ध पेटून उठला. त्यातच त्याला पकडण्यात इंग्रजांना यश आले. त्याला हातपाय बांधून राजुरच्या कोठडीत टाकले. परंतु त्याच्या आईच्या कल्पकतेने व पहा-यावरील जावजी बांबळेच्या सहका-याने तो सुटला. आणि परत देवगावात जाऊन देवजी महार, पाडोशीचा खंडू साबळे, चिचोंडीचा भाऊ धनगर यांच्या साथीने टोळी उभारून १८४४-४५ या काळात त्याने इंग्रजांना व सावकारांना त्रस्त करून सोडले.

पुढे फंदफितुरीने ही टोळी विस्कळीत झाली. त्यातच १८४५ च्या चकमकीत राघोजीचे अध्यात्मिक गुरु व मार्गदर्शक देवजी महार ठार झाल्याने तो आणखीनच खचला. राघोजी धार्मिक वृत्तीचा असल्याने आंबिवलीच्या पाटलाने त्याला दिंडी काढण्याचा आग्रह केला. वारकरी म्हणून तो त्यात सहभागी झाला. लेफ्टनंट गेलने २ जानेवारी १८४८ रोजी संन्याशाच्या वेशातील राघोजीला पंढरपूर येथील चंद्रभागेच्या वाळवंटात पकडले. त्याच्यावर राजद्रोहाचा खटला चालवून २ मे १८४८ रोजी ठाण्याच्या तुरुंगात त्याला फाशी दिले.

राघोजीने फाशीवर जाताना विनंती केली कि मी चोर नाही मला फासावर देऊ नका, माझे मुंडके तलवारीने उडवा. मला वीराचे मरण द्या. ठाण्याच्या तुरुंगात या आद्य क्रांतिकारकाचा पुतळा उभारला आहे. दरवर्षी २ मे रोजी त्याचे पुण्यस्मरण केले जाते.

बहिरवाडी





बहिरवाडी

बहिरवाडी हे अमृतवाहिनी प्रवरा नदीच्या काठावर वसलेलं, सह्याद्री पर्वताच्या डोंगररांगांनी वेढलेले अकोले तालुकातील एक लहानसा आदिवासी खेडे आहे. अवघ्या हजारभर लोकवस्तीचे हे गाव. १९४८ साली प्राथमिक शाळेच्या रूपाने गावात शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली गेली. एक शिक्षकी शाळा सुरु झाली. ही शाळा गावातल्या देवळात भरायची. याच शाळेने इथल्या माणसांना अक्षरांची ओळख करून दिली.
पिढ्यान-पिढया काळ्या मातीत राबणाऱ्यांच्या पंखांना बळ दिलं. त्यातील अनेकांनी आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर भरारी घेतली. गावात सुधारणाचे वारे वाहू लागलं तसं गावकऱ्यांच्या सहभागातून शाळेचं रूप हळूहळू बदलत गेलं. १०० टक्के पटनोंदणी व उपस्थिती असलेल्या या शाळेनेआदिवासी मुला-मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात टिकवून ठेवलं आहे. काळ बदलला तसे शिक्षणाचे संदर्भही बदलले. शाळाही बदलते आहे.



शैक्षणिक उपक्रम

१. डिजिटल स्कूल: पद्मश्री डॉ.विजय भटकर यांच्या ETH या संस्थेच्या मदतीने शाळा आता. "डिजिटल स्कूल" झाली आहे. माहिती आणि संचार तंत्रज्ञानाच्या साह्याने अध्ययन, अध्यापन, व्यवस्थापन व समन्वयातून शिक्षणाचा दर्जा उंचावायचा प्रयत्न करीत आहोत. पाठ्यपुस्तकातील धडे व कवितांचा आशय समजून घेतल्यानंतर अनिमेशनच्या तंत्रामुळे विद्यार्थी दृकश्राव्य अनुभवही घेतात. अनिमेटेड फिल्म्स, मनोरंजक उपक्रम स्वाध्याय, चाचण्या, खेळ यांच्या मदतीने शिकताना विद्यार्थ्यांना निरनिराळ्या विषयांची गोडी लागली आहे.

२. इंटरनेटच्या मदतीने शिक्षण: शाळेतील विद्यार्थी विविध संकेत स्थळांना भेटी देऊन माहिती घेतात. टिपण काढतात त्यामुळे अध्ययन-अध्यापन प्रक्रिया प्रभावी होते. इंटरनेटच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे माहिती तंत्रज्ञानाने निर्माण केलेल्या माहितीच्या महाजालाशी नाते निर्माण झाले.

३. परिसर भेट: मुलांचे अनुभव विश्व व भाव विश्व समृद्ध करणार्या निरनिराळ्या ठिकाणांना विद्यार्थी भेटी देतात. माहिती घेतात त्यातून त्यांच्या ज्ञानाची कक्षा रुंदावते. उदा. न्यायालय, आठवडे बाजार, तुरुंग, पोलीस स्टेशन, वीट भट्ट्या, सुतारनेट, शेती, किरण, दुकान, पिठाची गिरणी, बँका, शेती सेवा केंद्र इत्यादी.

४. पर्यावरण संवर्धन: विद्यार्थ्यांनी बहिरोबा टेकडीच्या परिसरात १५०० वर झाडे लावली आहेत. त्याचे संगोपनही ते करीत आहेत. दरवर्षी रक्षाबंधनाच्या दिवशी मुले झाडांना राख्या बांधून त्यांचे एका अर्थाने पालकत्व स्वीकारत असतात.

५. हस्तलिखित: दरवर्षी "आमची बाराखडी" नावाचे हस्तलिखित शाळेच्या वतीने तयार केले जाते. या हस्तलिखिताचे वैशिष्ट्य म्हणजे विद्यार्थी स्वतःच्या भाषा प्रकारात लिहितात. ग्रामीण, आदिवासी विद्यार्थ्यांची भाषा ते प्रमाणभाषा तसेच कुटुंब ओ शाळा यांना जोडणारा सेतू म्हणून या उपक्रमाचे आगळे महत्त्व आहे. आदिवासी भागातील विद्यार्थी कमी बोलतात. लिहिताना कसेबसे लिहितात. लेखनाच्या माध्यमातून त्यांना त्यांच्या भाषेत व्यक्त होता यावे म्हणून प्रमाणभाषा तसेच व्याकरण याला फाटा देऊन विद्यार्थी मुक्तपणे लिहितात.

६. शेतीची अवजारे: पारंपरिक पद्धतीने शेतीची मशागत करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या अवजारांचा शाळेत संग्रह केलेला आहे. त्या अवजारांची नावे, त्यांचे उपयोग, हे अवजारे वापरल्याने होणारे फायदे विद्यार्थी सांगतात.

७. फिल्म डे: विविध भाषांतील वैशिष्ट्यपूर्ण चित्रपट शाळेत दाखवले जातात. त्यावर चर्चा केली जाते. विद्यार्थी आपली मते मांडतात. मनोरंजनातून शिक्षण हा यामागील उद्देश आहेच याशिवाय एखाद्या गोष्टीची चिकित्सा करण्याचा वस्तुपाठ म्हणजे हा उपक्रम होय.

८. स्वच्छता दिवस: दर मंगळवारी विद्यार्थ्याची वैयक्तिक स्वच्छता तपासली जाते. आदिवासी विद्यार्थी स्वच्छतेच्या सवयीच्या बाबतीत कधी-कधी दुर्लक्ष करीत. परंतु स्वच्छता दिवस या उपक्रमात विद्यार्थ्यांच्या स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यात आले. त्यामुळे स्वच्छतेच्या सवयी अंगिकारण्याने विद्यार्थी आजारी पडण्याचे प्रमाण कमी झाले आहे. दर मंगळवारी विद्यार्थ्यांकडून शाळेत कडूनिंबाच्या काडीने दात घासून घेतले जातात.

९. जंगलवाचन: विद्यार्थ्यांना परिसरातील जंगलाची सहल घडविताना प्रत्यक्ष अनुभूतीने शिक्षण दिले जाते. झाडे, वेळी, फुले, पशु-पक्षी, डोंगर- दऱ्या, या विषयाची माहिती स्थानिक माहितगार लोक विद्यार्थ्यांना सांगतात.

१०. वाचन संस्कार: विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी लावण्यासाठी विविध उपक्रम राबविले जातात. परिपाठात श्यामची आई, एक होता कार्व्हर यासारख्या पुस्तकांचे प्रकट वाचन घेतले जाते. वाचलेल्या पुस्तकावर विद्यार्थी गटागटाने बसून चर्चा करतात.

११. कात्रण संग्रह: विद्यार्थी वर्तमानपत्रे वाचतात. त्यातील विविध विषयांवरील बातम्या, छायाचित्रे, यांची कात्रणे काढतात. ती वहीत डकवतात. ऑलिंपिक, पंढरीची वारी, संगणक, जलोत्सव, बोधकथा, खेळ आदी विषयावर आधारित कात्रण संग्रह विद्यार्थ्यांनी केले आहेत.

१२. शब्दाची बाग : शाळेसमोरील पडक्या वाड्याच्या भिंतीवरील दगडांना निरनिराळे रंग देऊन त्यावर इंग्रजी, मराठी, हिंदी भाषांतील शब्द लिहिले आहेत. त्यात धरणांची, जिल्ह्यांची, किल्ल्यांची, संतांची, वर्तमानपात्रांची नावे, जोडाक्षरे लिहिली आहेत. त्यातून मुले भाषिक खेळ व प्रश्नमंजुषा खेळतात. वाचन तसेच सामान्य ज्ञान या बाबी सुधारण्यासाठी याचा उपयोग होतो.

१३. हस्ताक्षर सुधार प्रकल्प: विद्यार्थ्यांचे हस्ताक्षर सुधारण्यासाठी या प्रकल्पाचा फायदा होतो. देवनागरी लिपीतील मुळाक्षरे योग्य पद्धतीने लिहिण्यासाठी विशेष मार्गदर्शन केले जाते व सराव घेतला जातो.

१४. छंदवर्ग: नृत्य, गायन, वादन, वक्तृत्व, पाठांतर, रांगोळी, रंगभरण, वाचन, भटकंती, निरीक्षण आदि छंदांची जोपासना व्हावी यासाठी शाळेत छंद वर्गांचे आयोजन केले जाते. त्यातून विद्यार्थ्यांच्या निरनिराळ्या कलागुणांना खतपाणी घालताना व्यासपीठही उपलब्ध करून दिले जाते.

१५. विद्यार्थी वाढदिवस: दैनंदिन जीवन संघर्षात आणि रोजीरोटीच्या प्रश्नात ग्रस्त असणाऱ्या आदिवासी कुटुंबात मुलांचे कोडकौतुक करायला आई-वडिलांना वेळ नसतो त्यामुळे वाढदिवस ही कल्पनाच आदिवासी मुलांना माहित नव्हती. इतर मुलांचे वाढदिवस पाहताना ती मुले मनातल्या मनात कुढायाची. शाळेने प्रत्येक मुलाचा वाढदिवस करायला सुरुवात केली आणि आदिवासी मुलांच्या आयुष्यात वाढदिवस साजरे होऊ लागले. त्यांच्या कानावरही हॅप्पी बर्थ डे... चे सूर पडू लागले. वाढदिवसाच्या दिवशी मुले चॉकलेट, केक न आणता शालेय साहित्य आणतात. वाढदिवसाच्या निमित्ताने आपल्या गरीब सोबत्यांना भेट देतात.

१६. फटाकेमुक्त शाळा: पर्यावरण रक्षणासाठी शिक्षकांनी केलेल्या जाणीव-जागृतीला चांगली फळे येत आहेत. शिक्षकांच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत विद्यार्थ्यांनी फटाके मुक्त दिवाळी साजरी केली. फटाके न वाजविण्याची शपथच मुलांनी घेतली.

१७. क्रीडा: मुले विविध योगासने, सामुदायिक काव्यात करतात. खेळ खेळतात. झाडावर चढणे, डोंगर चढणे असे निरनिराळे खेळही खेळतात.

१८. विविध गुणदर्शन: दरवर्षी विविध गुणदर्शन कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. शाळेतील १०० टक्के विद्यार्थी यात सहभागी होतात. रंगमंचावर येऊन आपली कला सादर करतात. त्यातून त्यांना नवा आत्मविश्वास प्राप्त होतो.

धुमाळवाडी

धुमाळवाडी
जिल्हा अहमदनगर जिल्हा
राज्य महाराष्ट्र
दूरध्वनी संकेतांक ०२४२४

टपाल संकेतांक ४२२६०१

वाहन संकेतांक महा-१७

निर्वाचित प्रमुख सौ.चौधरी

(सरपंच)

प्रशासकीय प्रमुख ग्रामसेवक

(श्री. जाधव)

धुमाळवाडी हे गाव भारताच्या अहमदनगर जिल्ह्यामधील अकोले तालुक्यातील ऐतिहासिक वारसा असलेले एक गाव आहे. स्वातंत्र्यसंग्रामात येथील ग्रामस्थांचे मोठे योगदान होते. धुमाळवाडी हे गाव ग्राम-स्वच्छता-अभियानासाठी वाखाणले गेले आहे.

नवलेवाडी

नवलेवाडी
 तालुका अकोले
जिल्हा अहमदनगर जिल्हा
राज्य महाराष्ट्र
दूरध्वनी संकेतांक ०२४२४

टपाल संकेतांक ४२२६०१

वाहन संकेतांक महा-१७

निर्वाचित प्रमुख श्री. संतोष काठे

(सरपंच)

प्रशासकीय प्रमुख ग्रामसेवक

(श्री. जाधव)



नवलेवाडी हे गाव महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्याच्या अकोले तालुक्यातील ऐतिहासिक वारसा असलेले गाव आहे. स्वातंत्रसंग्रामात येथील स्वातंत्रसैनिकांचे योगदान महत्त्वाचे आहे.

या गावाला इ.स. १८७५ पासूनचा इतिहास आहे.[ संदर्भ हवा ] १९१८ साली मामलेदाराच्या खूनाच्या खटल्यात इंग्रज सरकारने दाखल केलेल्या खटल्यात या गावातील प्रभू नवले व नरसु सहादू नवले या दोघा भावंडांना काळ्या पाण्याची शिक्षा झाली.

१९४२ साली पुकारलेल्या महात्मा गांधी भारत छोडो आंदोलनच्या साठी येथील २७ स्वातंत्र्य सैनिकांनी ब्रिटिश सरकारला विविध प्रकारे जेरीस आणण्याचा प्रयत्न केला. स्वातंत्र्य लढ्यात लढणाऱ्या नेत्यांना भूमीगत अवस्थेत मदत करण्याचे काम स्त्री-पुरुषांनी केले.

कोतुळ


कोतुळ
तालुका अकोले
जिल्हा अहमदनगर जिल्हा

राज्य महाराष्ट्र

दूरध्वनी संकेतांक ०२४२४

टपाल संकेतांक ४२२६१०

वाहन संकेतांक महा १७

कोतुळ हे गाव अहमदनगर जिल्हात अकोले तालुकात मुळा नदी किनारी आहे. ह्या गावचे पूर्वीचे नाव कुंतलपूर होते, जी चंद्रहास राजाची राजधानी होती.येथे कोतुळेश्वर नावाचे महादेवाचे मंदिर आहे.

अगस्ती आश्रम

अगस्ती आश्रम

अगस्ती आश्रम म्हणजे असामान्य तीर्थ क्षेत्र सर्व अनुकूल व प्रतिकूल बाबींचा विचार केल्यास श्री क्षेत्र अगस्ती ऋषी आश्रम हा जिल्ह्यात नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र दक्षिण भारतात एक आराध्य असे दैवत आहे.

पूर्वाश्रमीच्या दंडकारण्य व आजच्या आदिवासी तालुक्याच्या ठिकाणी प्रवरा उर्फ अमृतवाहिनीच्या तीरावर अतिशय निसर्ग रम्य परिसरावर अगस्ती ऋषींनी आपला आश्रम उभारला आहे. ही दक्षिणेतील पहिली मानवी वसाहत होय. भेटी अंती आज ही त्या पवित्र परिसरात दाखल होताच दंडकारण्याची आठवण झाल्याशिवाय रहात नाही.
अगस्ती आश्रम

लाखो भाविकांचे श्रध्दा स्थान असल्याने येथे शेकडो भाविक येत असतात. चारीधाम पूर्ण केले तरी अगस्ती दर्शनाविना ती यात्रा पूर्ण होत नाही. म्हणून यात्रा कंपनी येथे खास येऊन दर्शन घडवितात.शेजारील जिल्ह्यातून शैक्षणिक सहली आवर्जून येतात. भरपूर पाणी, सहा एकर असा परिसर चोहोबाजूस हिरवीगार वनश्री स्वच्छ व आरोग्य दायी हवा, दळणवळणाची उत्तम सोय अकोले शहरापासून अवघ्या दीड किलो मीटरवर आश्रम. बहुतांश भाविक दर्शनास पायी जातात. दूरध्वनी केंद्र, भ्रमणध्वनी केंद्र, बॅंका, पतसंस्था, मुख्य टपाल कचेरी, तहसिलदार ऑफिस, पंचायत समिती, पोलिस हेडकॉर्टर, ग्रामीण रूग्णालय, प्राथमिक पासून उच्च शिक्षणापर्यंत सोय. अगस्ती परिसर हा ध्वनी प्रदूषण, जल प्रदूषणापासून मुक्त आहे. ही इतर तीर्थ क्षेत्रा पेक्षा विशेष बाब आहे.

जिल्ह्यातील इतर तीर्थ स्थळे ही एक हजार वर्षाच्या आत उदयाला आलेली आहेत. पण अगस्ती आश्रम हा चार युगे झाली तरी भाविकांचे श्रध्दा स्थान म्हणून प्रसिध्द आहे. आज ही भाविक तितक्याच भावनेने आश्रम परिसरात येऊन धन्य होतात.

अगस्ती आश्रमाचे पौराणिक महत्व

अगस्ती ऋषी हे सर्व विश्वाला परिचित असे ऋषी असुन त्यांचा जन्म कुंभात झाला. अग्नि व वायु याचे ते अवतार. मित्रा-वरूणी त्यांचे वडील होत. जन्मतःच ते तप करण्यासाठी वनात निघून गेले. कठोर तपश्चर्या करून तपश्चर्येचा मुकूटमणी म्हणून ते प्रसिध्द झाले.

ऋषी म्हणजे जप, तप, ध्यान हेच त्यांचे कार्य पण अगस्ती ने लोकहिताची अनेक कार्ये करून हक्क मिळवुन देण्यात ते अग्रेसर राहिले. समुद्र प्राशन, नहुषपतन व विंध्य विजय याबरोबरच त्यांनी वातापी नावाच्या दैत्यास आपल्या जठराग्नीत पचविले. व त्याचा भाऊ इलवल यास हुंकाराने भस्म केले. व त्याच्या मुलास राज्याभिषेक करून राज्य प्रदान केले.

कावेरी व सुवर्णमुखरी ( प्रवरा ) या नद्या अगस्तीमुळेच भुमिवर अवतरल्या. अगस्तीने सर्वात मोठे कार्य केले ते म्हणजे शुक्रचार्यांनी दंड राजाला त्याची राज्य सीमा भस्मसात केली होती. ती भुमी शापमुक्त करून त्या भूमीवर सृष्टी निर्माण केली. व त्याचे रूपांतर दंडकारण्यात झाले. दंडकारण्याच्या मध्यावर आपला आश्रम उभारून पहिली मानवी वसाहत निर्माण केली. तोच आश्रम म्हणजे अकोले शहराजवळ प्रवरा तीरी असणारी पहिली वसाहत.

अगस्ती आश्रमाला महान परंपरा असून येथे सर्व प्राणी, पशु, पक्षी सर्वच वैरभाव विसरून एकत्र रहात होते. वनवासाचे काळी प्रभु राम अगस्ती आश्रमात प्रथम आले. तेव्हा ते लक्ष्मणाला म्हणाले “लक्ष्मणा, परत हे दृश्य आर्यवर्तात (भारतात) कधीही दिसणे शक्य नाही.” त्यावेळी अगस्तीने आपणाजवळ असणारे ब्रम्हास्त्र (बाण) श्री रामास याच आश्रमात भेट दिला. नंतर दोन वेळा येथे पुष्पक विमान उतरविले, श्रीरामाने अगस्तीचे दर्शन घेतले. भगवान शंकर पार्वती यांनी या आश्रमात तीन दिवस वास्तव्य केले होते. अशी या आश्रमाची ख्याती युगेयुगे चालली असून आजही ती प्रथा चालू आहे.

यात्रेकरूंच्या भेटी

अगस्ती ऋषी हे महान तपस्वी असल्याने त्यांच्या दर्शनाला येणा-या व्यक्तीस कधीही बंधन नाही. तसेच हा आश्रम सत्य युगापासुन अस्तित्वात आहे. इतक्या नोंदी ठेवणे शक्य नव्हते.

१) त्रेता युगात अगस्ती आश्रमात भेट देणारे पहिले महापुरूष प्रभुरामचंद्र लक्ष्मण व सीतावनवासात असत्यावेळी अगस्ती आश्रमात येऊन त्यांचे आशिर्वाद घेतले. त्यावेळी शस्त्रे, अस्त्रे व रावणाचा अंत करणारा बाण अगस्तीने श्रीरामास भेटी अंती दिला.

२) वैशाख शुध्द चतुर्थीस रामरावण युध्द पश्चात अयोध्येस परत जाते वेळी हनुमान वगळून सर्वजन पुष्पक विमान आश्रमात उतरून सर्वांनी अगस्तीचे दर्शन घेतले.

३) रामाचा अभिषेक झाल्यावर त्यांच्या राज्यात एका बालकाचा मृत्यु झाला. त्यावेळी श्रीराम पुष्पक विमानाने सह्याद्री पर्वतावर आले. व त्यांनी”शंबूक” केला. तेव्हा अगस्ती ऋषींनी त्यांचे आश्रमाजवळ बारा वर्षाचे जलशय्या व्रत केले होते. त्या समाप्तीस प्रभु उपस्थित राहिले. त्या रात्री त्याने ह्या आश्रमात निवास केला. व सकाळी अयोध्येस गमन केले.

४) सीतेचे अपहरण झाले तेव्हा भगवान शंकर न पार्वती तीन दिवस ह्या आश्रमात वास्तव्य केले होते. परतीच्या वेळी पार्वतीने सीतेचे रूप धारण करून श्रीरामांची परिक्षा केली होती.

५) रामायणपश्चात अगस्ती ऋषी अन्यत्र तीर्थयात्रेस गेले. तसेच हा दंडकारण्याचा मध्य असलेने हा भाग प्रसिध्दी पासून वंचित राहिला इ.स. १८०० पर्यंत ह्या भागाकडे दुर्लक्ष झाले. इंग्रजांच्या राज्याच्यावेळी ह्या भागात थोडाफार विकास झाला. आज ही हा तालुका आदिवासी म्हणूनच ओळखला जातो. इ.स. १९८५ पर्यंत ह्या आश्रमात जाण्यासाठी मोटारीचा मार्ग नव्हता. १९८७ला मोटार मार्ग तयार केला. त्यापासुन पुढे व्यवस्थित होत आहे. इ.स. १९५९ च्यावेळी अगस्ती ऋषींची नवीन मुर्ती ह.भ.प. सोनोपंत दांडेकर मामा व धुंडा महाराज देगलोरकर यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा झाली. भारत देश स्वतंत्र झाल्यापासून व राज्य घटना अस्तित्वात आल्यापासून खासदार व आमदार जे निवडणुकीत उतरतात. ते सर्व आपला प्रचार अगस्ती आश्रमापासुनच करतात.

अमृतेश्वर मंदिर / Amruteshwar Temple


अमृतेश्वर मंदिर

हेमाडपंती स्थापत्यशैलीचे उत्कृष्ट नमुना असलेले पुरातन अमृतेश्वर मंदिर रतनवाडी गावात आहे. हे गाव अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात आहे.

अमृतेश्वर मंदिर


मंदिराची रचना

मंदिराच्या गर्भगृहाला मागच्या बाजूला असणारा एक अर्धमंडप, मंडप, अंतराळ, व गर्भगृह असा या मंदिराचा तलविन्यास आहे.  मंदिराच्या रचनेत खाली थरयुक्त चौरस तळखडा असून वर अलंकृत चौरसाकृती खांब आहेत. या खांबांचा वरचा भाग अष्टकोनी असून त्यावर वर्तुळाकृती आणि वर कीचकहस्त आहेत. मंडपाचे छत घुमटाकार असून त्यावर ठरावीक अंतर सोडून नर्तक व वादकांच्या तिरप्या प्रतिमा आहेत. मंदिराचे शिखर भूमिज प्रकारचे असून शिखरावर चारही बाजूंनी एक एक अशा चार वेली आहेत.

आजोबागड / Aajobagad / Fort

आजोबागड

आजोबागड हा अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील  एक मध्यम चढाई श्रेणीचा गिरीदुर्ग प्रकारातील  किल्ला आहे. त्याची उंची ३००० फूट आहे 
बालाघाटाच्या रांगेत रतनगड आणि हरिश्चंद्रगड यांच्या मधोमध अगदी कडेला असलेला आजोबाचा डोंगर एखाद्या पुराण पुरुषासारखा दिसतो. या गडाची ३,००० फुट उभी भिंत ही प्रस्तरारोहकांसाठी एक आव्हान व आगळे-वेगळे लक्ष्य आहे.
आजोबागड

इतिहास

पुराणकथेनुसार, याच गडावर बसुन वाल्मिकींनी रामायण लिहिले. याच गडावर सीतामाईने लव आणि कुश यांना जन्म दिला. लव आणि कुश वाल्मिकींना 'आजोबा' म्हणत असत, म्हणूनच या गडाचे नाव आजोबागड असे पडले. गडावर वाल्मिकींचा आश्रम व समाधी आहे.

गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे

पहिली वाट पकडून वाल्मिकी ऋषींच्या आश्रमापाशी साधारणतः अर्ध्या तासात पोहचावे. वाल्मिकी ऋषींच्या आश्रमाजवळून गडाच्या माथ्यावर जाण्यासाठी वाट नसल्याने आपल्याला मुक्काम आश्रमातच करावा लागतो. येथे गडावर रहाण्यासाठी एक कुटी आहे.जवळच पाण्याचा झरा आहे. जर मुक्कामाचा कार्यक्रम असेल तर जेवणाची सोय आपल्याला घरूनच करून आणावी लागते. आश्रमाजवळून पुढे धबधब्याच्या वाटेने चढत गेल्यास सुमारे एक ते दीड तासानंतर वर एक गुहा लागते. येथे लवकुशाच्या पादुका खडकात कोरलेल्या आहेत. येथे डावीकडे एक पाण्याचे टाके सुद्धा आहे. या गुहेपर्यंत जाण्यासाठी लोखंडी शिडा देखील लावल्या आहेत. याच मार्गाने आश्रमात परतावे. अशा प्रकारे मुंबईहून येणार्‍यांसाठी आजोबाचा गड एक निसर्गरम्य अशी दुर्गयात्राच ठरते. गडाच्या माथ्यावर दोन ते तीन पाण्याची टाकी सोडल्यास पहाण्याजोगे विशेष असे काहीच नाही. अनेक दुर्गवीर रतनगड - आजोबाचा गड - हरिश्चंद्रगड असा ४ ते ५ दिवसांचा ट्रेक करतात.
शहापूर या गावी रिक्षेने अथवा एस.टी. ने यावे.येथून पहाटेच एस.टी ने अथवा जीपने डोळखांब-साकुर्ली मार्गे'डेणे' या गावी यावे. 'डेणे' गावातून जाताना मध्ये एक पठार लागते. पठारावर तीन वाटा एकत्र येतात. यातील एक बैलगाडीची वाट सरळ वाल्मिकी ऋषींच्या आश्रमापाशी घेऊन जाते. दुसरी वाट कात्राबाईच्या डोंगरात जाते आणि पुढे 'कुमशेत' या गावास जाऊन मिळते. तिसरी वाट मात्र जंगलात जाते. या वाटेने न जाणेच श्रेयस्कर.

कल्याण - मुरबाड - माळशेज - डोळखांब या मार्गाने :

कल्याण - मुरबाड - माळशेज - डोळखांब या मार्गाने सुद्धा डेणे गावी पोहचता येते.

कसारा - घोटी - राजूर - कुमशेत मार्ग :

गडावरचा माथा पहाण्यासाठी कसारा - घोटी - राजूर - कुमशेत मार्गेजाता येते.
गडावरती राहण्यासाठी आश्रम आहे. यात २० जणांना रहाता येते.
येथे जेवणाची सोय नसल्याने जेवणाचे साहित्य आपण स्वतःच घेऊन यावे.
येथे बारामाही पाण्याचा झरा सतत वाहत असतो.
गडावर सापांचे वास्तव्य असल्याने, योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे.
कुलंग
 सह्याद्रीच्या पर्वत मध्ये कळसूबाई च्या रांगेत प कळसूबाई शिखराच्या पश्चिमेला कुलंग किल्ला आहे. या रांगेची सुरुवात कुलंगगडापासून होते.

कुलंग किल्ला


कुलंगगडाच्या उत्तर पायथ्याला कुरंगवाडी नावाचे गाव आहे. इगतपुरीहून पिंपरी सद्रुधिन मार्गे येथे पोहोचता येते. तसेच कळसूबाईच्या पायथ्याच्या वारी घाटातून खाली उतरल्यावर इंदोरे मार्गे आंबेवाडीला पोहोचता येते. आंबेवाडीकडूनही कुलंगगडाचा पायथा गाठता येतो.



कळसूबाईची रांग इतर रांगांपेक्षा तुलनेत उंच असून ती कातळकड्यांनी घेरलेली आहे. त्यामुळे या रांगेतील किल्ले दुर्गम असून यांची चढाई चढणार्‍याचा कस काढणारी आहे. स .स. पासून १४७० मीटर उंचीच्या कुलंगगडावर पोहोचण्यासाठी प्रथम खालच्या पदरात पोहोचावे लागते. पदरात पोहोचण्यासाठी कुरंगवाडीतून दोन तासांची वाटचाल करावी लागते. पदरात आल्यावर मदनगड व त्या शेजारील सुळके आणि कुलंगचा कातळकडा मनात धडकी भरवतो.

समोर कुलंगचा कातळकडा ठेवल्यास डावीकडे मदनगड दिसतो. तेव्हा कुलंगच्या उजव्याबाजुने उतरणारा डोंगरदांड आपल्याला दिसतो. या डोंगरदांडावरुनच कुलंगची चढाई आहे. या दमछाक करणार्‍या वाटेने चढाई केल्यावर आपण कुलंगच्या कड्याला भिडतो. कड्याला कातळकोरीव पायऱ्या आहेत. या पायऱ्या चढून आपण दारातून गडप्रवेश करतो. गडाचा माथा अतिशय विस्तीर्ण आहे.

कुलंगगडावर पाण्याची टाकी मुबलक असून त्यातले पाणी स्वच्छ व पिण्यायोग्य आहे. ओळीने असणारी पाण्याची टाकी पाहून आपण कुलंगच्या पुर्व कड्यावर येतो. या पाताळवेरी कड्यावरुन कळसूबाई रांगेचे अप्रतिम दृष्य दिसते.

रतनगड किल्ला / Ratangad Fort

रतनगड

रतनगड हा अहमदनगर जिल्ह्याच्या अकोले तालुक्यातील  एक किल्ला आहे.
गडावर जाण्यासाठी पायथ्याशी रतनवाडीला पोहचायला हवे. रतनवाडीस संगमनेरहुन अकोले-राजुर-भंडारदरामार्गे जाता येते.
१७६३ साली हा किल्ला कोळी सरदार जावजी याने ताब्यात घेतल्याची गॅझेटमध्ये नोंद आढळते. १८१८ साली रतनगड पाच विभागांचे मुख्यालय होते. राजुरची ३६ खेडी, अलंगची २२ खेडी ही सह्याद्रीच्या वरची व सह्याद्रीच्या खालची सोकुर्ली परगण्याची ६० खेडी, वाडी परगण्याची २२ खेडी, जुरुश्रोशि परगण्याची ६० खेडी होती. १८२० मध्ये कॅप्टन गॉर्डनने गड ताब्यात घेतला. १८२४ साली तो आदीवासी सेनानी रामोजी भागंरेनी गड ताब्यात घेतला.


रतनगड किल्ला

गडावरील प्रेक्षणीय ठिकाणे -

१ - गणेश दरवाजा.

२ - रत्ना देवीची गुहा. (मंदिर)

३ - मुक्कामाची गुहा.

४ - प्रमुख दरवाजा. (यावर देवादिकांची शिल्पे पहावयास मिळतात)

५ - इमारतींचे जोते. (गडावर वास्तव्याला असलेल्या जुन्या भग्न इमारतींचे अवशेष)

६ - कडेलोट पॉइंट.

७ - राणीचा हुडा (भग्न बुरूज)

८ - प्रवरेचे उगमस्थान.

९ - मोर्च्याची ठिकाणे आणि बुरूज.

१० - अंधार कोठी व त्यातील पाण्याचे तले. (यातील पाणी हे अतिशय मधुर असून पिण्यास योग्य आहे )

११ - नेढ़ (गडावरील अत्युच्च ठिकाण, खडकाला असलेले आरपार भगदाड.)

११ - कल्याण दरवाजा. (यालाच साम्रद,कोकण किंवा त्रिम्बक दरवाजा असेही म्हणतात.)


गडावर रहाण्याच्या सोईसाठी दोन गुहा असून पाण्याची उपलब्धता आहे. गडावरील गुहांमध्ये अंदाजे ३० ते ३५ लोक राहू शकतात.

गडावर खान्याची सोय नाही. स्वताला ती व्यवस्था करावी लागते.

गडावरील पाण्याची टाके आहेत. त्यातील काही पिण्यायोग्य आहेत. कल्याण दरवाज्याजवळील झरा सुमधुर आहे.
गडावर जाण्यासाठी तीन वाटा आहेत. १ रतनवाडीहुन २ कुमशेतहुन शिवकालीन मार्गाने ३ साम्रदहुन
मुंबईहून इगतपुरी-घोटी मार्गे भंडारदरा धरणाला वळसा घालून रतनवाडीला पोहचता येते.
रतनवाडीला पोहचण्यासाठी अकोले-रतनवाडी बस सुविधा आहे. परंतु ती सोयीची नाही.
रतनवाडीतून गडावर पोहचण्याकरिता ३ तास लागतात.

कळसूबाई शिखर





कळसूबाई शिखर

 महाराष्ट्रातील सर्वांत उंच पर्वतशिखर कळसूबाई हे आहे.त्याची समुद्रसपाटीपासून 
उंची ५४०० फूट म्हणजे सुमारे १६४६ मीटर आहे. नाशिक-इगतपुरी महामार्गावरील
 घोटी या गावापासून घोटी-भंडारदरा रस्त्याने गेल्यास बारी हे गाव लागते.

कळसूबाई शिखर


या गावापासून कळसूबाई शिखरावर जाण्याचा मार्ग आहे. शिखरावर कळसुबाई देवीचे
एक छोटे मंदिर आहे. संगमनेरगावापासूनही भंडारदरामार्गे बारी गावास जाता येते.

भंडारदरा धरण / Bhandardara Dam & निळवंडे धरण / Nilwande Dam

प्रवरा नदीवर इ.स. १९१६ साली बांधण्यात आलेले भंडारदरा धरण अकोले तालुक्यात आहे.
तसेच प्रवरेवरच बांधले जात असलेले ७.८ टीएमसी क्षमतेचे निळ्वंडे धरणही येथे आहे.
१२५ मेगावॅट वीजनिर्मिती क्षमतेचा उदंचन जलविद्युत प्रकल्प असलेले घाटघर धरणही
अकोले तालुक्यात आहे.
भंडारदरा धरण
निळवंडे धरण

पावसाळ्यामध्ये हा परिसर भेट देण्यासारखा आहे .....

 

Sample text

Sample Text

Sample Text